Tuesday, October 4, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Bori (श्री नवदुर्गा देवी, बोरी, गोवा)

मित्रांनो, inquisition च्या काळात अनेक दैवतांनी फोंडा तालुक्यात आश्रय घेतला. बोरी गावचे आराध्य दैवत श्री नवदुर्गा त्यापैकीच एक. गोव्यातील सर्वात सुंदर नवदुर्गेची मूर्ती याच गावात आहे. काही लोकांच्या मते ही देवी मूळ सासष्टी तालुक्यातील बाणावली गावची. पोर्तुगीज दस्तऐवजात मात्र तसा उल्लेख सापडत नाही. पण एक मात्र खरे, की बाणावली ख्रिस्ती भाविक असूनही या देवीची उपासना करताना आढळतात.

श्री नवदुर्गा देवीची मूर्ती महिशासूरमर्दिनी रुपी आहे. अशी कोरीव अप्रतिम महिषासूरमर्दिनीची मूर्ती गोव्यात एकमेव असावी. मूर्ती चतुर्भुज असून देवी महिषासुर राक्षसाचा आपल्या हातातील त्रिशुलाने वध करते, असे दर्शविणारी आहे. अर्ध पशुरूप अर्ध मानवस्वरूपात महिषासुर फारच कमी मूर्तीत पाहायला मिळतो. देवीच्या डाव्या पायाजवळ सिंह आहे. हा सिंह हुबेहूब कदंब साम्राज्याच्या राजचिन्हासारखा दिसतो.

गोवा कदंब साम्राज्याचे राजचिन्ह सिंह होते. हा सिंह विशिष्ट शैलीचा होता; पण याचा फ़क्त एकच अवशेष आज गोव्यात शिल्लक आहे. पिलार सेमिनरिच्या संग्रहालयात हा पुरातत्वा अवशेष ठेवलेला आहे. या चिन्हाचे दुसरे उदाहरण बोरीतील नवदुर्गेच्या मूर्तीशेजारी आहे, असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. ही मूर्ती कदंब-होयसळ शैलीची असून १२ व्या शतकातील असावी. बोरिच्या या मंदिरात देवीला एका विशिष्ट शैलीचा पारंपारिक अलंकार केला जातो. याला कोकणीत "गंधा अलंकार" किंवा "गंधा पुजेचो अलंकार" म्हणतात. बकुळीच्या (ओवळां) काष्टाचे गंध उगाळून त्यामधे वेगावेगळे रंग घातले जातात. या रंगीत गंधातून देवांचे किंवा देवींचे अवयव दागिने दाखवले जातात. अशा -हेचा अलंकार फार कमी मंदिरात केला जातो. काही मंदिरात तर या पद्धतीचा अलंकार करण्याची प्रथा आता बंद केली आहे.

आपण सर्वजण मात्र या नवरात्रित श्री नवदुर्गा देवी चे दर्शन घ्यायला विसरु नका.

No comments: